विद्यार्थ्यांना नेहमीच एक उत्सुकता असते—यंत्र, तंत्र आणि मंत्र यामधून विज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची. केवळ वाचून नव्हे तर हाताने काम करत शिकणे ही शिकण्याची खरी मजा आहे. यातून ‘समजणं’ आणि ‘उमजणं’ यातील फरक लक्षात येतो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं—माझी रुची नेमकी कुठे आहे? हे विद्यार्थ्यांना समजतं.
विनोबा भावे म्हणतात, "माणूस शिकला पाहिजे, नाहीतर तो मूर्ख होईल. पण शिकला, तर बेरोजगार होईल!" या दोन्ही गोष्टींचा समतोल शिक्षणात हवा—हेच या 'स्किल ऑन व्हील' प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट आहे.
ही गाडी म्हणजे केवळ वाहन नाही, तर जनजागृतीचे चालते-फिरते केंद्र आहे.
सध्या ही एक कौशल्यविकासाची गाडी दुर्गम भागातील शाळांमध्ये पोहोचत आहे. लवकरच तळेरे केंद्र येथे दुसरी गाडी कार्यान्वित होणार आहे. Praj फाउंडेशन ने या नवीन गाडीसाठी CSR फंड दिला आहे. Cause to Connect व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्था मिळून संपूर्ण व्यवस्थापन पाहणार आहेत.
प्रत्येक आठवड्यात पाच शाळांमध्ये ही गाडी विद्यार्थ्यांपर्यंत कौशल्याचं दार उघडून देणार आहे.