भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानमध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर यांची भेट
जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर यांनी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या कार्यालयाला नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी तब्बल ४ तास थांबून संस्थेच्या कामाचा सखोल आढावा घेतला.
सरकार आणि प्रशासन हे लोककल्याणासाठी असते, मात्र जर लोकांच्या खऱ्या गरजांचा मागोवा घेतला गेला नाही, तर योजनांची अंमलबजावणी केवळ टॉप-डाउन पद्धतीने होते—त्यातून योजना तर पूर्ण होतात, पण खरा विकास घडत नाही. सामाजिक संस्थांना लोकांशी थेट संपर्क असल्यामुळे त्यांना सामाजिक भान असते, आणि लोकही त्यांच्या कार्यकर्त्यांशी मोकळेपणाने संवाद साधतात. मंदिर, चव्हाटा, पारावर होणाऱ्या चर्चांमधून उगम पावणाऱ्या गरजाच खऱ्या लोकसहभागाची पायाभरणी करतात. त्यामुळे प्रशासक जर खऱ्या अर्थाने संवेदनशील असेल, तर तो या संवादातून दिशा घेऊन ठोस निर्णय घेतो आणि लोकांच्या मनात घर करतो. समाजविकास हा एक विशाल ‘जगन्नाथ रथ’ आहे – तो हलण्यासाठी सरकार, समाज आणि संस्थांचा समन्वय गरजेचा आहे. हा समन्वय साधण्यासाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान सारख्या NGO आणि प्रशासन यांच्यातील संवाद ही काळाची गरज आहे.
या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांच्या नेतृत्वाखाली 18 कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांची माहिती सविस्तरपणे दिली. यात बायोगॅस, दुधव्यवसाय, गोपालक प्रशिक्षण,शेळीपालन प्रशिक्षण, कुकुटपालन प्रशिक्षण, महिला सबलीकरण, AI वापर, गोमय संशोधन, कृषी तंत्रज्ञान, जलसंवर्धन असे विविध विषय चर्चिले गेले.
हा संवाद आणि अनुभव, प्रशासन व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्यातील समन्वय साधण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.