गोमय गणेश मूर्ती - प्रशिक्षण शिबिर
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी भगीरथ प्रतिष्ठानच्या वतीने, पुण्यातील हुन्नर गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना गोमय गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री. विलास मळगावकर सर यांनी दोन दिवस या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी मातीपासून मूर्ती तयार करण्याचे तंत्र शिकवण्यात आले, तर दुसऱ्या दिवशी मूर्ती रंगवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
गोमय गणेश म्हणजे काय?
गोमय गणेश म्हणजे गाईच्या शेणापासून (गोमय) तयार केलेल्या गणेश मूर्ती. या मूर्तींमध्ये नैसर्गिक माती आणि शेणाचा समतोल वापर केला जातो, त्यामुळे त्या संपूर्णपणे पर्यावरणपूरक आणि जैविकदृष्ट्या सुरक्षित असतात. पारंपरिक प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींमुळे जलप्रदूषण होते, तसेच त्या सहजपणे विघटित होत नाहीत. याउलट गोमय गणेश मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात विरघळतात आणि त्यातील घटक जलसंपत्ती समृद्ध करतात.
गोमय गणेश मूर्तींचे फायदे
पर्यावरणपूरक: 100% नैसर्गिक घटकांपासून बनवलेली असल्याने जलप्रदूषण होत नाही.
शाश्वत विकासास मदत: शेतीसाठी उपयुक्त आणि जैविकदृष्ट्या विघटनशील घटकांचा समावेश.
आरोग्यासाठी फायदेशीर: गोमयात जंतुनाशक आणि सकारात्मक ऊर्जा देणारे घटक असल्याचे मानले जाते.
पर्यावरणपूरक पर्याय देण्याचा भगीरथ प्रतिष्ठानचा प्रयत्न
प्लास्टर ऑफ पॅरिसला विरोध न करता, सध्या सरकारी पातळीवर खूप मोठी चर्चा सुरू आहे की प्लास्टर ऑफ पॅरिस नको. पर्यावरणाची हानी होते वगैरे वगैरे. कोर्टामध्ये विषयसुद्धा सुरू आहेत. संस्थेमध्ये आपण नेहमीच असं म्हणतो की हे सगळे विषय जे आहेत ते लोकांनी निर्माण केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याची उत्तर लोकांकडेच असतात आणि ती आपण जेव्हा शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा योग्ये उत्तरच मिळते. म्हणजे फक्त कायदे कानून करून कुठच्याच प्रश्नाचं उत्तर आत्तापर्यंत मिळालं नाही. ना जाती निर्मूलन झालं ना अन्य कुठच्या गोष्टी झाल्या. उलट त्याच्यामुळे समाजातलं तेढ वाढलं.
मात्र, नकारात्मकतेवर भर न देता लोकांना योग्य पर्याय देण्याची गरज आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून भगीरथ प्रतिष्ठान गोमय गणेश मूर्तींच्या संशोधनात कार्यरत आहे. या संशोधनाला सोलापूर येथील ‘प्रीसिजन’ कंपनीच्या CSR निधीचा पाठिंबा मिळाला आहे. प्रतिष्ठानच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांना गोमय गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न
गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक पर्याय निवडणे ही केवळ गरज नसून जबाबदारीही आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसला विरोध करण्यापेक्षा लोकांना चांगले आणि शाश्वत पर्याय दिले तरच हा बदल समाजात सहज रूजेल. भविष्यात अधिकाधिक लोकांनी गोमय गणेश मूर्ती वापरून पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे.
आपणही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गोमय गणेश मूर्ती प्रशिक्षणात सहभागी होऊ शकता. किव्हा गोमय गणेश मूर्ती ठेवण्यास सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी भगीरथ प्रतिष्ठानशी संपर्क साधा.