आत्मनिर्भर सखी: एका नवउद्योजिकेची संकल्प 'सिद्धी'

05 Jun 2020 10:30:39
ही गोष्ट आहे एका तिशीतल्या जिद्दी तरुणीची.
जी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न पहाते, त्यासाठीचे प्रशिक्षणादी सोपस्कार पूर्ण करते आणि त्या व्यवसायाचा रीतसर अभ्यास करून अवघ्या वर्षभरात आपला उद्योजिका बनण्याचा *'संकल्प'* सिद्धीस नेते.
 
1_1  H x W: 0 x
 
*सिद्धी विनायक फोपळे* हे तिचं नाव,मुळची गोळवण गावची असलेली सिद्धी लग्नानंतर नांदोसच्या फोपळे घराण्यात दाखल होते.अपवादाने नजरेस पडणाऱ्या एकत्रित कुटुंब पद्धतीतलं फोपळ्याचं हे मोठं कुटुंब..
 
गावात शेती,किराणा दुकान आणि इतर छोटे मोठे व्यापार हे या कुटुंबाचे पारंपरिक व्यवसाय..
सिद्धी कला शाखेची पदवीधर आहे.कुटुंबाची आर्थिक संपन्नता असली तरी स्वतःचं काहीतरी करण्याची उर्मी तिच्या मूळ स्वभावात होती आणि अजूनही आहे,त्यामुळे लग्नानंतर तिला फक्त चूल सांभाळणे या जबाबदारीवर समाधान मानणे कधी जमलेच नाही.
मग ती आपल्या नवऱ्याच्या किराणा दुकानासाठी सामानाचे पॅकिंग करणे,
 
घरगुती मसाले तयार करणे अश्या कामात व्यस्त झाली.तरीही काहीतरी स्वतंत्र व्यवसाय करावा हे तिच्या मनाच्या कोपऱ्यात होतेच.एके दिवशी तिने अगदी मोकळेपणाने नवरा विनायकच्या कानावर ही गोष्ट घातली.
 
चर्चा उपचर्चेअंती तिने काहीतरी स्वतंत्र व्यवसाय करायचं ठरवलं.नवरा विनायकने संमत्ती दिली आणि आर्थिक बाजूची जबाबदारी आपल्याकडे घेतली.सिद्धीने आपल्या आवाक्यातल्या अनेक व्यवसायांवर विचार केला.
 
त्यातले बारकावे अभ्यासले. एके दिवशी नजीकच्या कट्टा बाजारातून फिरताना तिने जिज्ञासेने विचारपूस केली आणि तिच्या लक्षात आलं की आपल्या पंचक्रोशीत अंड्याची मागणी फार आहे आणि ती सगळी अंडी जिल्ह्याबाहेरून पुरवली जातात.मग असाच जिल्ह्याचा विचार झाला तिथेही लक्षात आलं की जिल्ह्याला जितकी अंडी लागतात त्याच्या पंचवीस टक्केही आपल्याकडे उत्पादन होत नाही.
विचार आला की या व्यवसायात आपल्याला पेलणारी एक मोठी संधी आहे.
 
बायोगॅस,कुक्कुटपालन अश्या विषयात झारापच्या 'भगीरथ ग्रामविकास'
संस्थेचं नाव ती ऐकून होती.
 
तिथे जावून तिने तीन दिवसाचे कुक्कुटपालन प्रशिक्षण घेतले.खरंतर प्रशिक्षणाला अनेकजण येतात,त्यापैकी नक्की किती जण प्रशिक्षण संबंधित व्यवसाय उभारू शकतात याचा अंदाज जाणकारांना त्यांच्या अनुभवाने आणि उमेदवारांच्या फेस रीडिंग वरून येतो.तसा तो भगीरथच्या संस्थेच्या डॉ प्रसाद देवधर यांना आला. त्यांना या तरुणी मध्ये मोठा आत्मविश्वास दिसला.त्यांनी तिला अंड्याच्या कोंबडी पालनाचा मंत्र दिला.
 
*बोले तो 'अंडे का फंडा'*
ट्रेनिंगचे प्रशस्तीपत्र हातात देताना त्यांनी सांगितलं की, ह्या व्यवसायाची उभारणी केलीस तर एक कॉल कर.
मध्ये साधारण वर्ष गेलं,त्या दिवशी डॉक्टरांना वॉट्स ऍपवर सिद्धीने एक फोटो टाकला.त्याखाली कोणताही कॅप्शन नव्हता. जो मी या पोस्टसोबत शेअर करतोय आणि मला विश्वास आहे,सिद्धीचा तो फोटो आत्मनिर्भरतेची व्याख्या स्पष्ट करेल..
 
प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने पहिल्या टप्प्यात अंडी देणारे ३००० पक्षी सोडायचे निश्चित केले.हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी सुमारे 17 ते 18 लाख खर्च अपेक्षित होता.तशीही ही रक्कम फार मोठी होती,पण बायकोची उमेद आणि उत्साह पाहून आर्थिक संकटाचे निवारण करण्याची हमी घेतलेल्या विघ्नहर्ता *विनायक* ने त्यातल्या काही रकमेची तरतूद करून दिली.आता प्रश्न होता उरलेल्या रक्कमेचा.
सिद्धीने अनेक सरकारी योजनामधून प्रयत्न करून पहिला पण प्रत्येक ठिकाणी अटी आणि शर्थी...
 
एकीकडे शेड आणि पिंजरे तर तयार होत होते,त्यासाठी कमी पडणाऱ्या रकमेसाठी मग घरातील सोने आणि एल आय सी पॉलीसी वरच्या कर्जाचा पर्याय पुढे आला,तो वापरला गेला.
 
आता फार वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. सरकारी अनुदान किंवा योजनेतील कमी व्याज या भानगडीत न पडता सरळ तिने उर्वरित खर्चासाठी दहा लाखाचे पर्सनल लोन घेतले आणि ठरविल्याप्रमाणे ३००० पक्षांची पहिली बॅच सोडली.
 
आता प्रकल्प सुरु होवून तब्बल सहा महिने झाले.या कालावधीत एकटीने जिद्दीने हा सगळा व्याप सांभाळत आपल्या स्वप्नाला एक नवी दिशा दिली.आज प्रतिदिन २८०० अंडी या प्रकल्पातून मिळतात.
 
तूर्तास स्वतः विक्रीचा विचार केलेला नाही त्यामुळे कुडाळ येथील एका व्यापाऱ्याला प्रकल्पावरून ही अंडी दिली जातात. अंड्यामागे ३०/३५ पैसे नफा कमी होतो पण विक्रीचा विषय सुरळीत होतो.
 
सिद्धी सांगते,इतक्या जास्त पैशाची गुंतवणूक करताना यशाची भीती ही असतेच, पण अश्यावेळी प्रशिक्षण घेतल्याचा फार उपयोग होतो.यश मिळणारच हा आत्मविश्वास,सोबत प्रचंड कष्ट,कामातलं सातत्य, प्रमाणित कंपन्यांचं खाद्य आणि इतर बाबतीत पक्षांची जीवापाड घेतलेली काळजी,पिंजऱ्यांची स्वच्छता,मार्केटच्या दराकडे लक्ष या प्रशिक्षणात शिकवलेल्या गोष्टी खूप कामी येतात.
 
सहा महिन्याच्या स्वतःच्या व्यवसायाच्या सुखद अनुभवातून तिचा आत्मविश्वास मला दुणावलेला दिसला.
मोठ्या जिद्दीने ती हे सर्व करत असल्याने कुटुंबातून सुद्धा रोज कौतुकाची थाप पाठीवर पडत आहे.
 
कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य लाभत आहे.त्यामुळे पुढे जावून ही पक्षांची संख्या दहा हजारावर नेण्याचा तिचा मानस आहे.
तिचे नांदोस हे गाव काही वर्षांपूर्वी *'पैशाचा पाऊस'* पाडणारे गाव म्हणून महाराष्ट्रात गाजले होते.ती पैशाचा पाऊस पाडणारी सिद्धी नक्की काय आणि कोणाकडे असते हे माहित नाही पण मला वाटतं हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या गावात असे दहा *'सिद्धी विनायक'* जोडीने आणि जिद्दीने या व्यवसायात उतरले तर सात्त्विक पैशाचा मोठा पाऊस नक्की पाडू शकतात.कारण या व्यवसायात साध्या कोंबडीचा सुद्धा बळी द्यायची गरज नाही आहे. इथे खूप साऱ्या संधी आहेत.
 
या व्यवसायाचा 'श्री गणेशा' करणाऱ्या *सिद्धी विनायक* ला खूप साऱ्या शुभेच्छा..
*या निमित्ताने आपल्या जिल्ह्यात या व्यवसायात नेमक्या काय संधी आहेत हेही पाहणं महत्वाचे ठरेल.*
*नक्की काय आहे हा 'अंडे का फंडा' हे पुढच्या भागात बघूया...*
 
*प्रभाकर सावंत*
9422373855
Powered By Sangraha 9.0