तळवणे गावातील घरांना चक्रीवादळ तसेच पावसाचा तडाखा बसला, त्यामुळे ऐन पावसात तळवणे सुतारवाडीतील तीन मेस्त्री कुटुंबांना या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. पहाटे ३.३० च्या सुमारास झोपेत असताना घराशेजारील एक भला मोठा वटवृक्ष या चक्रीवादळ व पावसामुळे घरावर कोसळला. केवळ दैव बलवत्तर म्हणून किरकोळ दुखापतीवर निभावले. मात्र घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, भांडी, फ्रिज, कपडे, घरावरील कौले, भिंत, सामान यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या कुटुंबांवर आभाळ कोसळले.
शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल मात्र एक सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील ग्रामस्थ, मित्र परिवार, तसेच सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी मेस्त्री कुटुंबांचा संसार सावरण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी पुढे येत आहेत. अशाच ‘सेवा सहयोग मुंबई’ व ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ यांच्या मार्फत श्री. पंढरी मेस्त्री यांना वीस हजार रुपये, श्री. साजो मेस्त्री व श्री. रावजी मेस्त्री यांना प्रत्येकी तीन-तीन हजाराची मदत केली. यावेळी ‘भगीरथ प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर तसेच डॉ. योगेश नवांगुळ यांनी या कुटूंबाना मानसिक आधार देत, अजून काहीही गरज पडली तर आपण मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच आपण ह्यापुढे या कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभे राहू असेही सांगितले. यावेळी डॉ. प्रसाद देवधर, डॉ. योगेश नवांगुळ, श्री. प्रभाकर सावंत, श्री. संजय लाड, सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर तुळसकर, श्री. विश्राम गावडे, श्री. पंढरी मेस्त्री, श्री. परशुराम मेस्त्री, श्री. साजो मेस्त्री, श्री. रावजी मेस्त्री व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
या नैसर्गिक आपत्तीत गरज आहे ती मेस्त्री कुटूंबाना मानसिक आधाराची आणि त्यांचा संसार उभा करण्याची, कारण श्री. पंढरी मेस्त्री हे वयोवृद्ध असून त्यांचा मुलगा श्री. सुरेंद्र व पत्नी ही मोलमजुरी करून जीवनाचा गाढा हाकतात. अशा वेळी त्यांना गरज आहे ती आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींची. ज्यांनी ज्यांनी या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी आपल्याला मदत केली त्यांचे आपण सदैव ऋणी आहोत. त्यांच्यामुळेच आपण आपला संसार, घर उभ करण्याचा प्रयत्न करत असल्याचे श्री. पंढरी मेस्त्री यांचा मुलगा श्री. सुरेंद्र यांनी ‘APM मराठी’शी बोलताना सांगितले.