कुडाळ तालुक्यातील निवजे गावात दूध संकलन केंद्र सुरू होऊन आज 7 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने गावातील निवजेश्वर मंदिरात संकल्प अभिषेक झाला.
निवजे गावाचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. दुध संकलन केंद्र, बायोगॅस प्रकल्प, सुधारित शेती, आणि समाजाच्या एकत्रित प्रयत्नांनी घडवलेले बदल हे दाखवतात की विकास फक्त आंदोलनांनी नव्हे, तर रचनात्मक कार्यातून शक्य होतो.
हत्तींच्या समस्येपासून ते बायोगॅस, भातशेती आणि सहकाराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या सकारात्मक बदलांपर्यंत, गावाने विकासाचा एक वेगळा मार्ग शोधला आहे. सत्य संकल्प, विज्ञान आणि सहकार्य यांच्या संयोगाने घडलेला हा प्रवास निश्चितच अनुकरणीय आहे.
आजच्या संकल्प अभिषेकाचा खास अर्थ आहे—फक्त देवासमोर प्रार्थना नाही, तर जे साध्य केले त्याचा आढावा आणि पुढील दिशेचा निर्धार. सर्वाधिक दर्जेदार दूध देणाऱ्या शेतकऱ्याला यजमान करण्याची कल्पना ही सुद्धा समाजातील श्रम आणि योगदानाच्या मूल्याला सन्मान देणारी आहे.
आजच्या दिवशी "निसर्ग फक्त बघून पोट नाही भरणार" हा मुद्दा विचार करायला लावणारा आहे. तथाकथित "पर्यावरणवादी" लोकांनी वास्तव समजून घेतले पाहिजे. विमानाने येणारे, जंगलात फिरणारे आणि कार्बन फूटप्रिंटवर लेक्चर देणारे लोक हे शेती, पशुपालन आणि गावकऱ्यांच्या जीवनाशी निगडित नसतील तर पुढील वाटचाल अजूनच कठीण राहील.
विकास आणि पर्यावरण याचा समतोल साधायचा असेल, तर केवळ निषेध किंवा उपदेश नव्हे, तर कृतीशील पर्याय द्यावे लागतील.
पर्यावरणवादाचा बाळबोध दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष शेती-व्यवसाय यामधला फरक सगळ्यांनीच समजून घेतला पाहिजे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन निसर्गाचा शाश्वत वापर कसा करता येईल, हे दाखवणं गरजेचं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्याजवळ असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन जेव्हा माणूस करतो, तेव्हा त्याची गरिबी जाते.
निवजे गावाने बायोगॅस प्रकल्प, सुधारित शेती, आधुनिक पद्धतीने दुग्धव्यवसाय, आणि सहकारातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हे दाखवून देतं की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संवेदनशील वापर गरिबी हटवू शकतो. नाहीतर गावात गाई-गुरं असतील, पण जर त्या सुधारित जातीच्या नसतील, कृत्रिम गर्भधारणेच्या सुविधा नसतील, तर उत्पादन वाढणार कसं? सेक्स-सोर्टेड सीमनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पन्न वाढू शकतं. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, तर गावं मागेच राहतील.
ह्याच्यामुळेच भगीरथ ग्रामप्रतिष्ठानचे असे ठाम म्हणणे आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संवेदनशील वापर करणारे विवेकबुद्धीचे कार्यकर्ते जेव्हा गावात असतील, तेव्हा गावातलं दारिद्र्य जाईल किंवा गावातल्या लोकांना रोजगार मिळेल. आमच्याकडे असणाऱ्या जैवविविधतेचे रूपांतर आम्हाला शाश्वत समृद्धीमध्ये करण्यासाठी दुध व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे, शेळीपालन आहे, हे सगळं केलं पाहिजे. नाहीतर, लोक निव्वळ extremist होतील.
हे केवळ निवजे गावापुरते मर्यादित नाही, तर इतर गावांसाठीही दिशादर्शक ठरू शकते. निवजे गावाने दाखवून दिलं की, "कृती महत्त्वाची!" निसर्ग आणि विज्ञान यांच्या योग्य संगमातूनच शाश्वत विकास आणि खऱ्या अर्थाने स्वावलंबन शक्य आहे!