वरील फोटो कुडाळ तालुक्यामधील वर्दे गावातील आहे. जलस्वराज्य या प्रकल्पामुळे हे गाव ‘भगीरथ’च्या संपर्कात आले. त्यानंतर ‘बायोगॅस’च्या चळवळीमध्ये गावाने भाग घेतला. भातशेतीमध्ये जमीन नांगरणीसाठी पॉवर टिलरची गरज जाणवत होती. एकूण १,९०,०००/- रुपयांचा पॉवर टिलर शेतकरी समूहाने घेतला आहे. हा टिलर घेण्यासाठी संस्थेने समूहाला रुपये १९,५००/- दिले आहेत, हे पैसे एका वर्षामध्ये संस्थेकडे परत येतील. सर्व शेतकरी लोकांसाठी असे यंत्र गावामध्ये येणे हा कौतुक सोहळा असतो. भातशेतीमध्ये नांगरणीचे ‘श्रम व वेळ’ यामुळे वाचणार आहेत. सारे काही सरकार करेल?, सबसिडी किती मिळणार? अशा प्रश्नांपेक्षा ‘आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो’ हा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. समूहशक्ती जागरण यासाठी महत्त्वाचे ठरते. या गावचे माजी सरपंच श्री. दिलीप सावंत यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली हे सर्व उपक्रम सुरु आहेत. कोकणामध्ये असे करणे हे खूप कठीण असते. पण एकदा का कार्यकर्ता या विश्वासाला पात्र ठरला की, साऱ्या अशक्य गोष्टीही शक्य होतात. आत्मविश्वासापासून आत्मसन्मान व आत्मनिर्भरताही येते.