सिंधुदुर्गामध्ये काजू पिकाचे उत्पन्न अधिक प्रमाणात घेतले जाते. काजू लागवड अल्पभूधारक कुटुंबासाठी उत्पन्नाचे साधन बनते आहे. या काजूवर प्रक्रिया केल्यास अधिक लोकांना रोजगार मिळतो. श्री. हनुमंत श्रीधर चव्हाण (गाव तेर्सेबांबार्डे, ता. कुडाळ) व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे (सौ. हर्षदा चव्हाण, कु. व्यंकटेश चव्हाण, कु. सिद्धी चव्हाण) हे छोटे काजू प्रक्रिया युनिट आहे. वर्षभरामध्ये १० ते १२ टन काजू बियांवर ते प्रक्रिया करतात. अधिक कामावेळी शेजारच्या ३ ते ४ महिलांना ते बोलावतात. ग्रामीण भागातील या गृहउद्योगासाठी पुणे येथील ‘सेवा इंटरनॅशनल’ या संस्थेने ऑटोमॅटीक कटर मशिन, ड्रायर, बॉयलर असे एकूण रु. २,८३,२००/- एवढ्या रक्कमेचे साहित्य दिले आहे. ३-४ वर्षांमध्ये ही रक्कम श्री. हनुमंत चव्हाण ‘सेवा इंटरनॅशनल’ या संस्थेकडे परत करतील. या रक्कमेवर कोणतेही व्याज नाही. केवळ आधारकार्ड व ‘भगीरथ प्रतिष्ठान’ संस्थेची शिफारस यांवर त्यांना ही मदत मिळाली आहे.
शहरे व ग्रामीण भाग यांचा अशाप्रकारचा संवाद होणं ही भविष्यकाळाची गरज आहे. सुलभ प्रकारे मिळणारी मदत शेतकरी प्रामाणिकपणे परत करतो, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. केलेली मदत परत आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या कुटुंबाला मदत करता येते. असा प्रयोग अधिक लोकांनी करायची गरज आहे. गावातला मनुष्य गावातच राहिला पाहिजे, तर त्याला रोजगाराची साधने निर्माण करून द्यावी लागतील. यासाठी सपोर्ट सिस्टिमची गरज आहे.