केळूस गावामध्ये श्री. वासुदेव बोवलेकर (बोवलेवाडी) यांनी दापोली कृषी विद्यापीठाच्या ‘कोकण भूरत्न’ या प्रजातीच्या भुईमूगाची लागवड केली आहे. पारंपारीक बियाण्यामध्ये (उपटी जात) एका भुईमूगाच्या झाडाला साधारणपणे ४ ते १० शेंगा असतात. कोकण भूरत्न (निमपसरी जात) या जातीमध्ये हेच प्रमाण ३५ ते ४५ शेंगा एवढे आहे. प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केल्यामुळे उत्पादनामध्ये वाढही झाली आहे. श्री. धनंजय गोळम (आत्मा कृषी विभाग, वेंगुर्ला) यांच्या मार्गदर्शनाखाली भुईमूगाचे बीजोत्पादन केले जाणार आहे. ‘भगीरथ’ने भुईमूग लागवडीच्या अभ्यासासाठी शेतकऱ्यांचा अभ्यासदौरा आजरा येथे आयोजित केला होता. श्री. राजू गव्हाणे (कृषी सहाय्यक, वेंगुर्ला) यांचे उत्तम मार्गदर्शन येथील शेतकऱ्यांना लाभत आहे.