आज संध्याकाळपासूनच दाढ प्रचंड दुखत होती, जेवणानंतर पेनकिलर घेऊनही फरक पडत नव्हता आणि माझा दाढेवरचा हात निघत नव्हता हे बघून आमच्या सावित्रीने हळद आणि मिठाचा गोळा करून दाढेत ठेवायला दिला. तो दाढेखाली ठेवला आणि शांत पडून मोबाईल स्क्रोल करत होतो, तेवढ्यात आमचे मित्र 'उमेद'चे अभय भिडे यांची छोटीशी पोस्ट आणि बचत गटातील महिलांचे हळद लावणीच्या वाफ्यांचे फोटो दिसले. त्यावर कमेंट म्हणून थोडं विस्ताराने डॉ. देवधरांचे हळद लागवडीचे फंडे... मोबाईल ठेवणार इतक्यात हळद घातलेल्या दुधाचा ग्लास… मनात म्हटलं आज काय हळद 'पिवळं' केल्याशिवाय सोडत नाही… यातला गंमतीचा भाग सोडा, पण आपल्याकडे सहज छंद म्हणून परसदारी केलेली हळद लागवड सुद्धा मोठी इकॉनॉमी साधू शकते. आजच्या वटपौर्णिमा या दिवसाचे माहात्म्य या अनुषंगाने म्हणतो, यासाठी सत्यवानांना फार काही करायची गरज नाही त्यांनी फक्त सावित्रीचे ऐकले पाहिजे. तिच्या अशा छोट्या छोट्या उपक्रमांचं कौतुक केलं पाहिजे, तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे. खरंतर कोरोना नंतरचे जग असेच असेल असे वाटते.
हळद लागवडीत सांगली जिल्हा अग्रेसर आहे. तिथे हळदीपासून कुंकू तयार केलं जातं आणि कुंकू हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं प्रतीक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्याकडे हळद लागवडीला चांगला स्कोप आहे. आपण आतापर्यंत ही जिल्ह्याबाहेरूनच आयात करतो. घराच्या परसदारात थोड्याशा श्रमात आपण हे पीक घेऊ शकतो. गुरे असतील तर शेणखताचा विषयही मिटतो. साधारण नऊ महिन्यात हे पीक येते. गेली काही वर्षे ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ ही संस्था हळद लागवडीसाठी लोकांना प्रोत्साहित करते आहे आणि वर्षाकाठी 3 ते 4 टन बियाणे उपलब्ध करून देते.
हळदीच्या अनेक जाती आहेत. त्यातले सेलम जातीचे बियाणे साठ रुपये प्रति किलो दराने शेतकऱ्यांना मिळते. शेणखत वगैरे वापरून याची शास्त्रशुद्ध पद्धतीने लावणी केली, त्याची निगा राखली तर या बियाण्यातून तीन किलो ओली हळद मिळते, ज्यातून पुढे अडीच किलो शुद्ध हळद पावडर तयार करता येते. या पावडरची बाजारभावाने किंमत प्रति किलो २०० रुपये म्हणजे एकूण रुपये ५०० रुपये अशी होते. अगदी सहज जाता जाता लागणारी किरकोळ अंग मेहनत बाजूला ठेवली, तर चक्क ७ ते ८ पट नफा मिळतो. यातलं अजून एक विशेष म्हणजे इतर पिकांप्रमाणे याला माकडांचा उपद्रव नाही. प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी हिरवा मसाला, गरम मसाला, औषध, स्वयंपाक वगैरेसाठी दीड ते दोन किलो हळद लागते असे गृहीत धरले तर प्रतिकुटुंब हळदीसाठीचा खर्च होतो ४०० रुपये. प्रत्येक गावात सरासरी ३०० कुटुंबे हिशोबात घेतली तरी ती रक्कम होते एक लाख वीस हजार रुपये.
जिल्ह्याचा विचार करता आणि असे गाव आणि गुणाकार करायला गेलं तर फार मोठी रक्कम होते, जी आपण सहज आपल्या जिल्ह्याबाहेर पाठवतो. हळद वापर ही गोष्ट छोटी आहे पण त्यावरचा हिशोब बराच मोठा आहे. अशा अनेक हिशोबांकडे आता बारकाईने बघण्याचे दिवस सुरू झालेत. अर्थात सुरुवात प्रत्येकाला आपल्यापासूनच करावी लागेल. खेडी स्वयंपूर्ण व्हायची असतील तर छोटे छोटे नियोजन महत्वाचे आहे. एखादे उत्पादन विकणे, त्यातून नफा मिळवणे वगैरे नंतरचे, आधी त्याजोगे बाहेरून शक्य तेवढे खरेदी न करणे महत्वाचे. यासाठी हळूहळू आता ती बार्टर सिस्टीम, बलुतेदारी पुन्हा सुरू होईल. आमच्या परसदारी सुद्धा आम्ही पाच किलो हळद लागवड केलीय. तुम्हीही प्रयत्न करून बघा.
-- प्रभाकर सावंत (मोबाइल - 9422373855)