गेली दोन वर्ष माध्यमिक विद्यालय नेरूर-माड्याचीवाडी या हायस्कूलमधील विद्यार्थी कौशल्यधारित विकासाचे उपक्रम राबवित आहेत. पाठ्यपुस्तकांप्रमाणेचं शिक्षणाचा भाग बनलेले हे शाळेमधील प्रयोग आज या भागाची ओळख बनले आहेत. शाळेत मिळालेल्या या प्रशिक्षणातून आज अनेक कुटुंबांना रोजगाराचे नवे साधन सापडले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपला आवडीचा विषय शिकवताना आपल्यातल्या कलागुणांना वाव देण्याची पुरेपूर संधी या IBRT (Introduction to Basic Rural Technology) उपक्रमामुळे मिळाली आहे.


          ८वी व ९वी मध्ये शिक्षण घेण्याऱ्या या मुलांनी आपली आवड जोपासताना शाळेचा पूर्ण परीसर उत्पादित केला आहे. पारंपारिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीमधून विक्रमी उत्पादन मुलांनी घेतले. शेतीमध्ये कांदा, मिरची, भाजीपाला, हळद, सुरण यांची लागवड, तर बागायती मध्ये नारळ, काजू यांचे उत्पादन मुलांनी घेतले. यासोबतच शिवणकाम, भरतकाम, कलाकुसर, वाहन दुरुस्ती, फॅब्रिकेशन ही सर्व कामे मुलांनी शिकून तर घेतलीच व ती प्रत्यक्षात करून शाळेच्या उत्पन्नामध्येही मोलाचा वाटा उचलला. ‘शिकता शिकता स्वयंपूर्णतेकडे’ हा मूलमंत्र जपताना येथील विद्यार्थी दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाविन्यतेचा परीपाठ घालून देणारी ही शाळा आज शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन मुलांकडूनच नवा अध्याय लिहून घेत आहे.


          ‘पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच प्रत्येकाच्या हातामध्ये कौशल्य’ ही संकल्पना साकार करण्यासाठी ILFS सावली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग, शाळेमध्ये शिक्षण घेऊन गेलेले अनेक माजी विद्यार्थी यासाठी परिश्रम घेत आहेत. हे सर्व विविध उपक्रम यशस्वीपणे राबवित असताना एका सुसज्ज अशा इमारतीची कमतरता शाळेला गेली अनेक वर्ष भासत होती. परदेशस्थित एका देणगीदारांनी शाळेला रू. १० लाखांची देणगी देऊन शाळेचे प्रशस्त व सुसज्ज अशा इमारतीचे स्वप्न पूर्ण केले.