ग्राम विकासाची काही नवी टवटवीत क्षणचित्रे

स्रोत: भगीरथ प्रतिष्ठान      तारीख: 09-May-2017
“यांचा सातबारा कोराच आहे, कारण त्यांच्या नावे जमीनच नाही.” श्री. नारायण तुकाराम चेंदवणकर (गाव बाव-बांबुळी, ता. कुडाळ) हे प्रयोगशील शेतकरी आहेत. स्वतःच्या नावे जमीन नाही, पण भाडेपट्टीवर जमीन घेऊन ते नेहमीच शेतात हिरवी जादू करत असतात. श्री. चेंदवणकर यांच्या शेतातील १३ किलो वजनाचे ऑगस्टा जातीचे कलिंगड.

ही फुलं कांद्याची आहेत...

 

ही फुलं कांद्याची आहेत, यातून पुढच्या वर्षासाठी कांद्याचे बी तयार होते. नानेली (ढेपगाळूवाडी) येथील श्री. अमित पावसकर हे व्यावसायिक पद्धतीने कांद्याची शेती करतातच, पण पुढच्या वर्षी लागणारे बियाणे स्वतःच तयार करतात. ‘भगीरथ’ने यांच्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली.


काय करू नको ते सांगण्यापेक्षा काय करावे हे सांगणे अधिक सकारात्मक असते. “वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे...” हे जरी खरे असले तरी अन्नब्रम्ह तयार होण्यासाठी झाडांचे तोडणे व चूलीत जाळून उष्णता, धूर होणे याला पर्याय म्हणून सौ. सोनिया सुनील पालव (गाव निवजे) हिने ‘बायोगॅस’ स्वीकारला. UNDP च्या SGP कार्यक्रमामुळे हे शक्य झाले.

मिथेनच्या वातावरणातील उत्सर्जनामुळे जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) होते. अशा गहन विषयावर चर्चा करण्यात उर्जा फुकट न घालवता आम्ही बायोगॅस बांधायचे ठरवले. म्हणता-म्हणता ६ हजार बायोगॅस बांधून पूर्णही झाले. बायोगॅस बांधायचा निर्धार व संस्थेने UNDP/SGP सोबतच्या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना केलेली मदत यांमुळे हे शक्य झाले. जागतिक समस्येचं एक छोटं उत्तर शोधण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो.

‘रूबीनाच्या आयुष्याला मेरीट प्राप्त झालं.’’ रूबीना पटेल गोधड्या शिवण्याचे काम करते. २ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सध्या रूबीना सांभाळते. संस्थेने तिला शिवण मशीन घेऊन दिले आहे. ही मदत नाही, तर तिला स्वतःच्या पायावर उभे करणे आहे. मदत माणसाला दुर्बल बनविते, सबलीकरण तिला आत्मनिर्भर बनवेल.